जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः पुरुष कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम लढतीत भारताने रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत दक्षिण कोरियाने 229-229 अशा बरोबरीनंतर शुटआउटमध्ये बाजी मारली. 2014च्या आशियाई स्पर्धेतही भारताने याच गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी कोरियाला पराभवाची चव चाखवली होती. रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश असलेल्या या संघाने सुरूवातीपासूनच वर्चस्व गाजवले होते.
भारताने पहिला सेट 60-56 असा जिंकून चार गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. पहिल्या सेटमध्ये भारतीय खेळाडूने सहाही प्रयत्नांत दहापैकी दहा गुण घेतले. दुसऱ्या सेटमध्ये कोरियाकडून पलटवार झाला. त्यांनी हा सेट 57-54 असा जिंकून गुणांचे अंतर कमी केले आणि सामना 114-114 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये 58-56 अशी बाजी मारताना भारताने 172-170 अशी आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये पहिल्या तीन प्रयत्नांत कोरियाच्या खेळाडूंना 9, 9, 10 असे गुण मिळवता आले. त्याउलट भारताने 10, 9, 10 असे गुण घेत आघाडी आणखी भक्कम केली. अखेरच्या तीन प्रयत्नांत कोरिया खेळाडूंनी दोन परफेक्ट 10 नेम साधले. पण हा खेळ शुटआउटमध्ये गेला. त्यात भारताला हार पत्करावी लागली.