अभिजित देशमुखथेट जकार्ता येथून
लहानपणापासून मला देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करायची होती. आशियाई स्पर्धेत सेलिंगमध्ये रौप्य पदक जिंकून हे स्वप्न पूर्ण करण्यात आल्याचा मला आनंद आहे, असे सेलिंगमध्ये भारतासाठी पदक जिंकलेल्या श्वेता शेरवेगर हिने ‘लोकमत’ला सांगितले.अत्यंत खडतर झालेल्या अंतिम फेरीत श्वेताने आपली सहकारी वर्षा गौतमसह चमकदार कामगिरी केली. याबाबत श्वेता म्हणाली, ‘ अंतिम फेरीतील परिस्थिती अत्यंत कठीण होती. वारा १५ नॉट्सपर्यंत (२३ किमी/तास) पोहचला होता. आमची ज्या बोटीचा वापर केला ती ४९ एफएक्स वेगवान बोट असून यावर जास्त भार द्यावा लागतो. त्यात माझे आणि वर्षा गौतम वजन तुलनेत कमी असल्याने बोट हाताळणे कठीण झाले होते. तरीही आम्ही सयंम राखला आणि स्वत:ला झोकून देत पदक जिंकले.’ सेलिंग स्पर्धा उशीराने सुरुझाली आणि त्यात पाठोपाठ शर्यती असल्याने पदक जिंकणे सर्वांसाठी आव्हानात्मक होते. हे आव्हान यशस्वीपणे पेलताना कशी तयारी केली याविषयी श्वेता म्हणाली, ‘२४ सप्टेंबरपासून सेलिंग स्पर्धा सुरु झाली आणि दररोज ३ फेऱ्या व्हायच्या. त्यामुळे या स्पर्धेत पदक जिंकणे खूप अवघड होते.’दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्वेता - वर्षा यांना न्यायालयीन लढाईही द्यावी लागली होती. याबाबत श्वेता म्हणाली, ‘हे पदक आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण यासाठी आम्हाला प्रतिस्पर्धी संघाव्यतिरिक्त मायदेशातील अनेक लोकांविरुद्धही लढावे लागले होते. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवल्यानंतरही आमचा या स्पर्धेसाठी विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे भारतीय सेलिंग फेडेरेशनविरुद्ध आम्ही दिल्ली उच्च न्यायालयत दाद मागितली. यावेळी अनेकदा मला आशियाई स्पर्धा हुकणार असेच वाटत होते. पण दोन महिने चाललेल्या या खटल्यात न्यायालयने आमच्या बाजूने निकाल दिला.’तसेच, ‘आम्हाला प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. जर आम्हाला वेळ मिळाला असता तर आम्ही सुवर्ण जिंकू शकलो असतो. सेलिंगमध्ये जोडीदारासोबत ताळमेळ खूप महत्वाचा असतो. वर्षाने गेल्या आशियाई स्पर्धेत कांस्य जिंकले होते. त्यामुळे तिच्या अनुभवाचा येथे फायदा झाला,’ असेही श्वेताने यावेळी म्हटले.लेझर बोट ४.७ हा खुला प्रकार असल्याने पुरुष व महिला दोन्ही खेळाडूंचा यामध्ये समावेश असतो. २३ खेळाडूंचा सहभाग असलेल्या या शर्यतीमध्ये १४ पुरुष होते. त्यामुळेच पदक जिंकल्याचे आश्चर्य आहे. जर ही स्पर्धा केवळ महिलांची असती, तर मी नक्कीच सुवर्ण जिंकले असते. - हर्षिता तोमर