पालेमबांग : कुस्तीमध्ये भारतीयांची शानदार कामगिरी मंगळवारीही कायम राहिली. दिव्या काकरानने भारतासाठी शानदार खेळ करताना महिलांच्या ६८ किलो वजनी फ्री स्टाइल गटात कांस्य पदक पटकावले. तिसऱ्या स्थानाच्या प्लेआॅफमध्ये चिनी तैपईच्या चेन वेनलिंगचा पराभव करीत दिव्याने कांस्य पटकावले. यंदाच्या स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारी दिव्या तिसरी मल्ल ठरली. याआधी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारतासाठी सुवर्ण कमाई केली होती.कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत २० वर्षीय दिव्याने एकहाती वर्चस्व राखताना तैपईच्या वेनलिंगचा १० - ० असा धुव्वा उडवला. दिव्याने गेल्या वर्षी राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. याआधी चांगली स्पर्धेत चांगली सुरुवात केलेल्या दिव्याला उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या शारखु तुमेंतसेत्सेगविरुद्ध १-११ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, शारखुने आपल्या खेळात कमालीचे सातत्य राखताना उपांत्य लढतीत तैपईच्या वेनलिंगचा १०-० असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे उपांत्यपूर्व फेरीत शारखुकडून पराभूत झालेल्या दिव्याला कांस्य पदकासाठी लढण्याची संधी मिळाली. ही संधी सत्कारणी लावताना दिव्याने कोणतीही चूक न करत लढत एकतर्फी ठरवली आणि वेनलिंगचा सहज पराभव करत भारताच्या खात्यात कांस्य पदकाची भर टाकली.
Asian Games 2018: दिव्या काकरानला कुस्तीमध्ये कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 5:26 AM