अभिजित देशमुखथेट जकार्ता येथून
जकार्ता - आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचा प्रथमच समावेश झाला आणि आम्ही येथे खेळायला येणार या निर्णयाने आमचा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. येथे खेळताना पहिल्याच वर्षी आम्ही कांस्यपद जिंकले त्यामुळे तो आनंद अजून द्विगुणीत झाला; पण या सर्वांचे श्रेय मी माझे पती स्वर्गीय मुरली देवरा यांना देते आणि हे पदक त्यांना समर्पित करते. कारण, त्यांनीच हा खेळ मला शिकविला. ते जर आता असते तर त्यांनासुद्धा खूप आनंद झाला असता, असे ब्रिजमध्ये मिश्र गटात कांस्यपदक जिंकलेल्या भारतीय संघांच्या खेळाडू मुंबईच्या हेमा देवरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
हेमा देवरा म्हणाल्या की, ब्रिजमध्ये कांस्यपदक जिंकून आम्ही इतिहास बनवून भारताचा गौरव वाढविला आहे, याचा अभिमान वाटतो. माझ्यासारखेच संघातील इतर खेळाडू किरण नदर, हिमानी खंडेलवाल, बाकिराजू सत्यनारायण, गोपीनाथ मन्ना, राजीव खंडेलवाल यांना पदक जिंकण्याचा आनंद आहे; पण आमची अपेक्षा सुवर्ण किंवा रौप्यपदकाची होती. जपान, चीन, इंडोनेशिया यांच्या सारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून, आम्ही उपांत्य फेरी गाठली. ब्रिजमध्ये अगदी छोट्या चुकीमुळे सामना हरलासुद्धा जातो, उपांत्य फेरीत थायलंडविरुद्ध ४ पेक्षाही कमी गुणांनी आम्ही हरलो त्याची खूप खंत आहे.
आम्ही सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप चांगली तयारी केली होती, म्हणून आम्ही गटात शीर्षवर राहिलो. ब्रिज हा चेस प्रमाणेच बुद्धीचा खेळ आहे,आपल्या जोडीदारासोबत चांगली रणनीती, संमेलन प्रणाली आणि चर्चा खूप महत्त्वाची असते. प्रत्येक वेळी आम्ही सुधारणांवर लक्ष केंद्रित करतो आणि स्पर्धात्मक विचार नेहमीच असतो. संभावतेचा खेळ असला, तरी संरक्षणसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसरीकडे या खेळाची रणनीती अशी आखावी लागते की, आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा नेहमीच ४-५ पाऊल पुढचा विचार करणे आवश्यक आहे.ब्रिज खेळायला मी खूप उशिरा सुरुवात केली; कारण माझे प्रथम प्राधान्य घर आणि कुटुंब होते. भारतीय ब्रिज संघात माझी निवड २००० मध्ये चाचणी स्पर्धेतून झाली. त्याच वर्षी आम्ही श्रीलंकेमध्ये पहिली स्पर्धा जिंकली. मी अतापर्यंत १२-१३ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मॉन्ट्रियाल, कॅनडा स्पर्धेमध्ये बिल गेट्स, वॉरेन बफेट यांच्या विरुद्ध खेळण्याची संधी लाभली. माझा या खेळातील तरुण व उद्योन्मुख खेळाडूंना सल्ला आहे की, त्यांनी या खेळाचा सखोल अभ्यास करावा आणि खेळताना नेहमी प्रतिस्पर्धी खेळाडू कसे खेळतात, याचे अवलोकन करावे. आशियाई स्पर्धेत या खेळाला स्थान मिळाले आहे, त्यामुळे हा खेळ पुढील काळात अजून वाढेल असा विश्वास आहे.आमची अपेक्षा सुवर्णपदकांची होती, कांस्यपदक मिळून आम्ही संतुष्ट नाही. आमच्या संघात सगळेच नॅशनल चॅम्पियन आणि इंटरनॅशनल स्पर्धा जिंकलेले खेळाडू आहे. ब्रिजच्या काही स्पर्धा अजून बाकी आहे, कमीत कमी अजून २ पदके अपेक्षित आहेत. हा खेळ सांघिक असून, तालमेल खूप महत्त्वाचा असतो. आपल्या भारत देशामध्ये ब्रिजचे महत्त्व वाढत आहे आणि तरुणसुद्धा या खेळाकडे आवडीने वळत आहेत. आगामी काळात या प्रत्येक राज्यात हा खेळ खेळला जावा, असा आमचा प्रयत्न राहणार आहे.- देबाशिष रे,भारतीय ब्रिज संघाचे मार्गदर्शक