नाशिक : इराणमध्ये क्रीडाक्षेत्राकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. तेथील खेळाडू रजत आणि कांस्यपदकांना फारसे महत्त्व देत नाहीत, त्यांचे केवळ सुवर्णलक्ष्य असते. अशा देशातील महिलांच्या कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात आपली भूमिका महत्त्वपूर्ण राहिली याचा मोठा आनंद असल्याचे इराण कबड्डी संघाच्या प्रमुख प्रशिक्षक शैलजा जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या महिला कबड्डी संघाने भारतासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले आणि या संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन जगाला परिचित झाल्या. नाशिकमध्येच संपूर्ण क्रीडा क्षेत्रात कारकीर्द करणाऱ्या जैन या नुकत्याच इराणहून नाशिकला परतल्या यावेळी प्रस्तुत प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आपला नाशिक ते इराण प्रवास उलगडला. इराण हा कठोर नियमांचा आणि महिलांवर निर्बंध लादणारा देश असल्याचे बाह्य जगताला वाटत असले तरी येथे महिलांना व्यापक स्वातंत्र्य देखील आहे. त्याचाच परिणाम म्हणून इराण सध्या क्रीडाक्षेत्रात अगे्रसर कामगिरी करीत आहे. इराणचा मुख्य खेळ कुस्ती मानला जातो. परंतु आता इराणने इतर खेळातही आघाडी निर्माण केली आहे. कबड्डीतील सुवर्णपदकाने त्यावर शिक्कामोर्तबही झाले असल्याचे जैन यांनी सांगितले.इराणमध्ये असलेले एक सहकारी केवलचंद सुतार यांच्याकडे तेथील क्रीडा विभागाने महिला कबड्डीसाठी भारतीय महिला कोच संदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांनी आपले नाव सुचविले आणि एक महिन्यांच्या करारावर त्यांनी आपणाला इराणला बोलविले.