मुंबई - ' सोच किस लिये खेल रहा है! तुने करना है!,' तेजिंदरपाल सिंग तूर जेव्हा गोळाफेक करत होता त्यावेळी स्टेडियमवर उपस्थित असलेले प्रशिक्षक मोहिंदर सिंग ढिल्लोन जोरदारात ओरडत होते. ते असे का बोलत आहेत, याचे उत्तर स्पर्धा संपेपर्यंत कोणालाच मिळाले नव्हते. तेजिंदरने २०.७५ मीटर गोळाफेक करून भारताच्या खात्यात सुवर्ण जमा केले आणि हळूहळू सर्व गोष्टी उलगडत गेल्या.
शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या तेजींदरने वडिलांखातर गोळाफेक खेळाची निवड केली. 2017च्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 20.40 मीटर गोळाफेकला होता. मात्र, त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रतेसाठीचे 20.50 मीटर अंतर गाठता आले नाही. त्यानंतर 2017च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तूरने 19.77 मीटरसह रौप्यपदक जिंकले होते. अवघ्या 0.03 मीटरने त्याचे सुवर्णपदक हुकले होते.
आशियाई स्पर्धेचे सराव शिबीर पतियाळा येथे भरलेले होते. त्यावेळी तो सरावाचे वेळापत्रक सांभाळून लुधियानाला आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जायचा. काही काळ त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवरही झाला होता. मात्र, प्रशिक्षकांनी समजावल्यानंतर त्याने सरावावर लक्ष केंद्रित केले. या बलिदानाचे फळ त्याला शनिवारी मिळाले. विजयानंतर त्याने त्वरित आपल्या आईला फोन लावला आणि सुवर्ण जिंकल्याची बातमी बाबांना सांग, असे सांगितले.