मुंबई - रिओ ऑलिम्पिकमधील तो प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो... चीनच्या सून यानविरूद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या विनेश फोगटला दुखापत झाली होती... वेदनेने विव्हळत असलेल्या विनेशची कारकीर्द धोक्यात येते की काय, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, तिने जोरदार कमबॅक केले आणि भारताला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली. विनेशचा हा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा आहे.
गिता आणि बबिता यांच्यासोबत तिने कुस्तीचे धडे गिरवले. त्यामुळेच या सुवर्णपदकानंतर तिच्याबाबत जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली होती, अगदी परदेशी मीडियालाही. फोगट भगिनींवर बॉलिवूडमध्ये 'दंगल' हा चित्रपट निर्माण करण्यात आला होता. त्या फोगट भगिनींपैकीच विनेश ही एक असल्याचा समज अनेक परदेशी मीडियाला झालेला पाहायला मिळाले. एका चिनी पत्रकाराने तर थेट 'दंगल' चित्रपटाची वेबसाईट ओपन केली आणि विनेशच्या नावाचा तो शोध घेऊ लागला.