जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताच्या टेबल टेनिस पुरुष संघाने मंगळवारी इतिहास घडवला. त्यांनी भारताला आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसमधील पहिले पदक जिंकून दिले. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत जपानचा पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, उपांत्य फेरीत गतउपविजेत्या कोरियाकडून हार पत्करावी लागली. ग्यानसेकरण साथियन, अचंता शरथ कमल आणि अमलराज अँथोनी यांना कडव्या संघर्षानंतरही पराभव पत्करावा लागला.अनुभवी शरथ कमलचे स्वप्न साकारशरथ कमल याला चौथ्या प्रयत्नात आशियाई पदक जिंकता आले. 2006 ते 2014 या कालावधीत तीन आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला. यंदाची स्पर्धा ही त्याची अखेरची आशियाई स्पर्धा होती आणि त्यात पदक जिंकल्याचे त्याने समाधान व्यक्त केले आहे.