जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताला 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजित सिंगने सुवर्णपदक जिंकवून दिले. अजून एक आनंदाची बाब म्हणजे भारताच्या जिन्सन जॉन्सनने या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत मनजितने सुवर्णपदक पटकावताना हे अंतर 1:46.15 मिनिटांमध्ये पूर्ण केले. हे अंतर कापण्यासाठी जॉन्सनला 1:46.35 एवढी मिनिटे लागली.८०० मीटर क्रीडा प्रकारात अव्वल तिघांत येण्याची ही भारताची पहिली वेळ नाही. मनजित आणि जॉन्सन यांनी तब्बल ४६ वर्षांनी भारताला आशियाई स्पर्धेत ८०० मीटर शर्यतीत दोन पदक जिंकून दिली. १९६२ च्या आशियाई स्पर्धेत भारताच्या दलजीत सिंग आणि अंम्रीत पाल यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर या प्रकारात दोन पदक जिंकण्याचा हा पहिलाच योग. पाहा हा व्हिडीओ... यापूर्वी भारताच्या कोणत्याही खेळाडूंना अव्वल दोन स्थान मिळवता आले नव्हते का? याचे उत्तर हो असे मिळेल. कारण नवी दिल्ली येथे १९५१ साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत भारतीयांनी अशी विक्रमी कामगिरी केली होती. आठ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारताच्या रंजीत सिंग आणि कुलवंत सिंग यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल ६७ वर्षांनी मनजित आणि जिन्सन यांनी त्या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली. आशियाई स्पर्धेतील ८०० मीटर शर्यतीत भारताच्या नावावर ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि १ कांस्यपदक जमा झाले आहेत.