जकार्ताः भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील कुठलाही सामना हा थरारक, उत्कंठावर्धकच असतो, याची प्रचिती आज इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत आली. हँडबॉल क्रीडा प्रकारात अटीतटीच्या सामन्यात भारतानेपाकिस्तानचा अक्षरशः शेवटच्या सेकंदात २८-२७ अशा फरकाने पराभव केला.
भारत आणि पाकिस्तान हे संघ गट-३ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस होती. प्रत्यक्ष सामन्यादरम्यान ती क्षणाक्षणाला वाढत गेली. कधी भारताची आघाडी, तर कधी पाकिस्तानची, अशी अटीतटी संपूर्ण सामन्यात रंगली. आधी ५-२ अशी आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानशी भारतानं ५-५ अशी बरोबरी केली. पण त्यानंतर पुन्हा पाकिस्ताननं सरशी केली. त्यांचा पाठलाग करत भारतानं त्यांना १० गोल्सवर गाठलं आणि नंतर मागेही टाकलं. त्यानंतर बरोबरी - आघाडीचा हा खेळ शेवटपर्यंत सुरू राहिला. शेवटच्या मिनिटांमध्ये भारतानं २७-२५ अशी आघाडी घेतली होती, पण पाकनं लागोपाठ दोन गोल करून ती भरून काढली. त्यामुळे भारतीय चाहत्यांची धडधड वाढली. भारतीय संघानं टाइमआउट घेतला आणि शेवटच्या सेकंदाला पुनियानं गोल करून विजय साकारला.
मलेशियाविरुद्धच्या पहिला सामना भारतानं ४५-१९ असा जिंकला होता. पाकिस्तानविरुद्ध त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. पण सलग दुसरा सामना जिंकून त्यांनी पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.