जकार्ता : भारताला सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन कांस्यपदक पटकावण्याची संधी होती. पण या तीनपैकी एकही पदक भारताला पटकावता आले नाही. ही तिन्ही पदके भारताला कुस्तीमध्ये मिळू शकली असती, पण त्यामध्ये भारताला यश मिळाले नाही.
महिलांच्या कुस्तीमध्ये 62 किलो वजनी गटामध्ये साक्षी मलिकने सोमवारी निराशा केली. साक्षीकडून भारताला फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण साक्षीला कांस्यपदकही पटकावता आले नाही. कांस्यपदकाच्या लढतीत साक्षीला 2-12 अशा मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले.
भारताला महिलांच्या कुस्तीमध्ये पुजा धांडा हिच्याकडून 57 किलो वजनीगटात कांस्यपदकाची अपेक्षा होती. पण पुजाला कांस्यपदकाच्या लढतीत 1-6 असा पराभव पत्करावा लागला होता.
पुरुषांच्या कुस्तीमध्ये 125 किलो वजनीगटामध्ये भारताच्या सुमित मलिकला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. कारण ही लढत चांगलीच रंगतदार झाली होती. सुमितनेही या लढतीत शर्थीचे प्रयत्न केले. पण या लढतीत त्याला 0-2 या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.