मुंबई : आशियाई स्पर्धा म्हटली की कबड्डीमधलं सुवर्णपदक भारताचं हमखास ठरलेलं. पण यावेळी आशियाई स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये एकही सुवर्णपदक मिळाले नाही, पण तरीही भारताने गुणतालिकेत आतापर्यंत सातवे स्थान पटकावले आहे. सध्याच्या घडीला भारताच्या खात्यात 24 पदके आहेत. ही 24 पदके नेमकी कोणत्या खेळात मिळाली, हे जाणून घ्या.
भारताला आतार्यंत सर्वात जास्त 9 पदके नेमबाजीमध्ये मिळाली आहेत. नेमबाजीमध्ये भारताने 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि तीन कांस्यपदके पटकावली आहेत. आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला कुस्तीपटूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण भारताला बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी सुवर्णपदक मिळवून दिलं, तर एक कांस्यही भारताच्या नावावर आहे.
रोइंगमध्ये भारताने एका सुवर्ण आणि दोन कांस्य, अशी तीन पदके पटकावली आहेत. कबड्डीमध्ये महिला संघाला रौप्य, तर पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. टेनिसमध्येही भारताने एक सुवर्ण आणि एक कांस्य, अशी दोन पदके पटकावली आहे. भारताला वुशूसारख्या खेळात चार कांस्यपदके मिळाली आहेत, तर सापेकटकरावसारख्या खेळात एक कांस्यपदक मिळाले आहे.