जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय अॅथलेटिक्सपटूंची आशियाई स्पर्धेतील मोहीम सात सुवर्ण, 10 रौप्य आणि दोन कांस्यपदकांनी संपली. ट्रॅक अॅण्ड फिल्ड स्पर्धेच्या अखेरच्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले. भारतीय अॅथलेटिक्सपटूंची ही आशियाई स्पर्धेतील तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी भारतीय अॅथलेटिक्सपटूंनी 1951 मध्ये 34 ( 10 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य) आणि 1982 मध्ये 21 (4 सुवर्ण, 9 रौप्य व 8 कांस्य) पदकांची कमाई केली होती आणि या दोन्ही स्पर्धा नवी दिल्ली येथे झाल्या होत्या. त्यामुळे जकार्तात भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी ही परदेशातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
भालाफेकीतील पहिलेच सुवर्णनीरज चोप्राने ( 88.06 मीटर) आशियाई स्पर्धेत भारताला भालाफेकीतील पहिलेच सुवर्णपदक जिंकून दिले. 1982 मध्ये भारताच्या गुरतेज सिंग यांना कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले होते.
पाचपैकी पाचभारताच्या महिला धावपटूंनी 4 बाय 400 मीटर शर्यतीत सलग पाचवे सुवर्णपदक नावावर केले. हिमा दास, एम आर पुवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा कोरोथ यांचा समावेश असलेल्या 4 बाय 400 मीटर रिले संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक नावाव केले. हिमा आणि पुवम्मा यांचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. याआधी हिमाने 400 मीटर शर्यतीत रौप्य, तर पुवम्माने 4 बाय 400 मीटर मिश्र रिले संघाचे रौप्य जिंकले होते.