पालेमबांग : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पालेमबांग येथे आयोजित स्पर्धा प्रकार आटोपण्याच्या स्थितीत आहेत. पण भारतीय खेळाडूंना मिळणारा ५० डॉलर दैनिक भत्ता मात्र अद्याप देण्यात आलेला नाही. भारतीय पथकातील एका अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला.
येथे टेनिस, नेमबाजी आदींसह अन्य काही क्रीडा प्रकारांचे आयोजन झाले. टेनिसमधील भारतीय खेळाडूंचे सर्वच सामने आटोपले आहेत. नेमबाजी स्पर्धेचा रविवार अखेरचा दिवस असेल. भारतीय खेळाडूंनी नेमबाजीत दोन तर टेनिसमध्ये एक सुवर्ण मिळवून दिले. दैनिक भत्ता मात्र त्यांना मिळालेला नाही. स्पर्धा आटोपताच अनेक टेनिसपटू आणि नेमबाज येथील क्रीडाग्राम सोडून दुसºया देशाकडे रवानादेखील झाले आहेत. नेमबाज द. कोरियाकडे निघाले असून, दुहेरीत सुवर्ण विजेती टेनिस जोडी बोपन्ना-शरण हे अमेरिकन ओपनसाठी न्यूयॉर्कला निघून गेले. सर्वच खेळाडूंना फोरेक्स कार्ड देण्यात आले असले तरी, खात्यात अद्याप पैसे मात्र जमा झालेले नाहीत. भारतीय आॅलिम्पिक संघटनेतर्फे आशियाडसाठी नियुक्त करण्यात आलेले पथकप्रमुख बी. एस. कुशवाह यांनी लवकरच पैसे जमा होतील, असे आश्वासन दिले. दिल्लीत संपर्क साधून कुशवाह यांनी दैनिक भत्त्याची बाब अधिकाºयांच्या कानावर टाकली. क्रीडा भत्ता क्रीडा मंत्रालय मंजूर करीत असले तरी, खेळाडूंपर्यत पोहोचविण्याची जबाबदारी आयओएची आहे. पैसे मिळण्यात उशीर झाला तरी अनुभवी नामवंत खेळाडूंना फारसा फरक पडत नाही, नवख्या खेळाडृूंना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
स्वत:ची ओळख गुप्त राखण्याच्या अटीवर क्रीडाग्राममध्ये एक खेळाडू म्हणाला,‘क्रीडाग्राममध्ये सर्वकाही उपलब्ध असले तरी अनेकदा पैशाची गरज पडते. पैसे द्यायचेच आहेत तर स्पर्धा सुरू होण्याआधी द्यायला काय हरकत आहे? अनेक खेळाडू निघून गेल्यानंतर कार्ड अॅक्टिव्ह करण्यात येतील.
नेमबाजी संघाचा एक अधिकारी म्हणाला,‘गोल्ड कोस्टमधील राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी असे नव्हते. येथे मात्र भत्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी पैसे मिळाल्यास आम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही,’अनेकदा चुकीची माहिती पुरविल्यामुळेदेखील भत्ते मिळण्यास उशीर होतो. खेळाडू अनेकदा योग्य पासपोर्ट क्रमांक देत नाहीत. अर्ज भरताना चुका होतात. दिल्लीतील अधिकारी खेळाडूंना भत्ता मिळावा, यासाठी कामाला लागले आहेत, असे बी.एस.कुशवाह म्हणाले.