जकार्ता - भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन रौप्यपदक जिंकून दिले. सकाळच्या सत्रात दीपक कुमारने 10 मीटर एअर रायफल प्रकारात, तर 19 वर्षीय लक्ष्य शेओरन याने पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्याने दोघांनाही 'सुवर्ण' भेद करता आला नाही. अगदी थोडक्यात त्यांचे सुवर्णपदक हुकले.
10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपकने पात्रता फेरीतील सुमार कामगिरीनंतर अंतिम फेरीत जोरदार कमबॅक केले. त्याने 247.7 गुणांसह रौप्यपदकावर कब्जा केला. सुवर्णपदकाच्या शर्यतीत त्याने चीनच्या यांग हाओरानला कडवी झुंज दिली. चीनी खेळाडूने 249.1 गुणांच्या आशियाई स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. चायनीज तैपेईच्या लू शाओचूनने ( 226.8) कांस्यपदक जिंकले. भारताच्या रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
त्याच्यासमोर चायनीज तैपेईच्या यांग कुनपीचे आव्हान होते. लक्ष्यने अखेरच्या 15 प्रयत्नांत केवळ एकदाच अपयश आले आणि तेच त्याला महागात पडले. कुनपीचे 50 पैकी दोन नेम चुकले आणि त्याने विश्वविक्रमाची बरोबरी केली. कुनपीने 48 गुणांची कमाई केली आणि 2017 मध्ये स्पेनच्या अलबर्टो फर्नांडेझने विश्वविक्रम नोंदवला होता.
दरम्यान महिलांच्या ट्रॅप प्रकारात सीमा तोमरला अंतिम फेरीत सहाव्या स्थानावरच समाधान मानावे लागले. तिने 25 पैकी 12 गुणच कमावले.