जकार्ता : भारतीय कम्पाऊंड संघांना मंगळवारी सुवर्णपदकाला गवसणी घालण्यात अपयश आले. भारतीय संघांना १८ व्या आशियाई गेम्समध्ये महिला व पुरुष या दोन्ही विभागात कोरियाविरुद्ध पराभव स्वीकारत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात चार सेट््सनंतर भारतीय पुरुष (अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन सैनी) कोरियापेक्षा एका गुणाने आघाडीवर होती, पण रिव्ह्यूवर कोरियाने एका गुणाची कमाई केली.रिव्ह्यूनंतर अखेरच्या सेटमध्ये कोरियाचा एक ९ अंकाचा स्कोअर १० मध्ये बदलण्यात आला. त्यामुळे लढत २२९-२२९ अशी बरोबरीत सुटली. यानंतर झालेल्या शूटआॅफमध्ये कोरियाने (एक इनर १०, एक १० आणि एक ९) असे गुण नोंदवले. भारताने दोनवेळा १० आणि एकदा ९ असा स्कोअर केला. या पराभवामुळे निराश झालेला वर्मा म्हणाला, ‘अशा चुरशीच्या अंतिम लढतीबाबत काही सांगता येत नाही. हवेच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावली. आज आमचे नशीब चांगले नव्हते.’भारतीय महिला कम्पाऊंड संघाला दक्षिण कोरियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेखा वेन्नाम यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला कोरियाविरुद्ध २२८-२३१ ने पराभव स्वीकारावा लागला. चुरशीच्या झालेल्या या लढतीचा निकाल अखेरचा नेम लगावल्यानंतर झाला.