मुंबई - 18 व्या आशियाई स्पर्धेचा पहिला दिवस भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले, नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र गटात कांस्यपदक जिंकले. त्याशिवाय जलतरणपटू साजन प्रकाशने 200 मीटर बटरल्फाय प्रकारात अंतिम फेरा गाठून भारतीयांच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.
आशियाई स्पर्धेत 32 वर्षांत भारतीय जलतरणपटूने अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. पण, त्याचे कुटुंबीय केरळमध्ये आलेल्या पूरात अडकले आहेत आणि अशा परिस्थितीतही तो देशाला पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील या 24 वर्षीय खेळाडूला येथील परिस्थितीची फारशी कल्पना नाही. त्याचे घर हे पेरियार धरणानजीकच आहे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणानजीकचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. "माझे कुटुंबीय कुठे आहेत? कसे आहेत? याची काहीच कल्पना नाही. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, इतकेच मला माहित आहे. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो,"असे साजनने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.
1986नंतर आशियाई स्पर्धेत जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला तो पहिलाच भारतीय आहे. 1986 साली खजान सिंग यांनी अंतिम फेरी गाठली होती. केरळ पुरग्रस्तांसाठी साजनने काही आशियाई स्पर्धेच्या आदल्या दिवशी मदतीची मागणी केली होती. त्याने अभिनेता सिद्धार्थ याचा मॅसेज रिट्वीट केला होता.