जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः आशियाई स्पर्धेच्या 14व्या दिवशी भारताला बॉक्सर अमित पांघलकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता झाली. अमितने 49 किलो वजनी गटाच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव केला. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताचे बॉक्सिंगमधील हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा फारसा अनुभव पाठिशी नसतानाही अमितने वडिलांनी सांगितलेला सल्ला ध्यानात ठेवला. त्याच जोरावर त्याने अत्यंत चुरशीच्या सामन्यात 3-2 असा विजय मिळवला. सुवर्णपदक स्वीकारल्यानंतर राष्ट्रगीताच्या वेळी अमितचे डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते आणि ते चित्र पाहताना देशवासीहीयही भावूक झाले.'' पदकाचा अधिक विचार करू नकोस... प्रत्येक सामन्याचा बिनधास्त सामना कर, वडिलांच्या या सल्ल्यामुळेच मी यशस्वी ठरलो,'' असे मत अमितने व्यक्त केले. हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील छोट्याश्या गावातील अमितने 2009 पासून बॉक्सिंग शिकायला सुरूवात केली. मोठ्या भावाच्या हट्टाखातर तो या रिंगमध्ये उतरला आणि आज 9 वर्षांनी त्याने आज इतिहास घडवला. यशाचे हे शिखर सर करताना वडील विजेंदर सिंग यांचा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या अमितची आत्तापर्यंतची कामगिरी बरीच बोलकी आहे. 2009 मध्ये त्याने सब ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट सुरूच ठेवली होती. 2017चे ग्रँड प्रिक्स स्पर्धेतील सुवर्ण त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले. 2018 मध्ये त्याने इंडियन ओपन व स्ट्रॅड्जा मेमोरियल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि केमिस्ट्री चषक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.