अभिजीत देशमुखथेट जकार्ता येथून
इंडोनेशिया येथे मी सुवर्णपदक जिंकण्याच्या निर्धाराने आलो आहे. आतापर्यंतच्या लढतीतील कामगिरीवर मी समाधानी आहे. चीनचा बॉक्सर तूहेला अर्बीके टी याला मी अनेक वेळा पराभूत केले आहे. तो माझ्या उंचीचा असल्यामुळे ठोसे मारणे सोपे जात होते, त्याला नमविण्याचा विश्वास मला होता. मी पहिल्या दोन्ही राउंडमध्ये आक्रमक होतो. कारण मला त्याची सहनशक्ती संपवायची होती, पण त्याच्या काही ठोशांनी मला चकित केले. पहिल्या राउंडमध्ये त्याचा एक वरचा कट माझ्या भुवयांजवळ जोरात लागला आणि रक्त वाहू लागले. ब्रेकमध्ये त्यावर उपचार झाले. पण तेव्हा काहीच वाटले नाही. दुसऱ्या राउंडमध्ये मात्र भुवयांजवळ वेदना सुरू झाल्या. तेव्हा मी आणखी आक्रमक झालो आणि तूहेला अर्बीके टीला रागाच्या भरात चांगलेच ठोसे मारले. तिसºया फेरीमध्ये मी थोडा बचावात्मक राहिलो; कारण भुवयांजवळ आणखी ठोसे पडले असते तर माझी जखम वाढली असती, असे भारताचा स्टार मुष्टीयोद्धा विकास कृष्ण याने ‘लोकमत’ला सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘माझा अनुभव कामी आला. शिवाय माझे बचावात्मक धोरण अचूक ठरले. सामना संपल्यानंतर मी निवांत श्वास घेतला. मला लढत जिंकल्याचा विश्वास होता. उपांत्य फेरी गाठल्यामुळे पदक निश्चित होते, त्यामुळे मी आनंदी आहे. सामना संपल्यानंतर मी पहिला भारतीय मुष्टियोद्धा आहे ज्याने तीन आशियाई क्रीडा स्पर्धांत पदक जिंकलेले आहे. असे माझ्या कोच सँटियागोने सांगितले तेव्हा विश्वासच बसत नव्हता.’ सुवर्ण पदक पटकावण्याचाच निर्धार असल्याचे सांगताना विकास म्हणाला, ‘मी २०१४ मध्ये रौप्य मिळवले होते, पण मला २०१० च्या स्पर्धेतील सुवर्णपदकाची पुनरावृत्ती करायची आहे. उपांत्यफेरीत मला कजाकिस्तानच्या अबिल खानविरुद्ध लढायचे आहे. त्याच्याविरुद्ध चुरशीची लढत होईल. पण आम्ही रणनीती आखलेली आहे. माझे प्रयत्न सुवर्णपदक जिंकण्याचेच असेल, पण शेवटी रिंगमध्ये काय होईल, हे मी आताच सांगू शकत नाही.’सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार : अमित पांघलव्हिडीओ पाहून आम्ही विरोधकांचा चांगला अभ्यास केला आहे. त्याचा आम्हाला फायदा होत आहे. मनोजकुमार सारख्या वरिष्ठ मुष्ठियोद्धांनी मला खूपच प्रेरित केले आहे. ते नेहमीच मला मार्गदर्शन करत असतात,’ असे अमित पांघल म्हणाला. तो पुढे म्हणाला, ‘बुद्धिमान किंवा आक्रमक मुष्टीयोद्धाविरुद्ध काय धोरण पाहिजे, याची आम्ही नेहमीच चर्चा करतो. आतापर्यंत हे वर्ष चांगले गेले आहे. मी राष्ट्रकुलमध्ये रौप्य जिंकले. माझे ध्येय येथे सुवर्ण जिंकून देशाचा गौरव करण्याचा आहे. मला पाच पंच स्कोअरिंग प्रक्रिया आवडते. आम्हाला सामना संपल्यानंतरच गुण मिळतात. त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवावी लागणार आहे.’