जकार्ता : भारताच्या राही सरनोबतने 25 मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत राहीने अखेर दमदार कामगिरी केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. राहीचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी राहीने 2014 साली झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
पात्रता फेरीत भारताच्या मनू भाकरने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यामुळे तिच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या. पण पदक पटकावण्यात मनू अपयशी ठरली. पात्रता फेरीत फारशी चांगली कामगिरी करता न आलेल्या राहीने मात्र अंतिम फेरीत नेत्रदीपक कामगिरी केली.
महिलांच्या 25 मी पिस्तुल प्रकारात राहीला सुरुवातीपासूनच थायलंडच्या यांगपाबून हिच्याकडून कडवी झुंज मिळाली. राहीने यावेळी बऱ्याचदा आघाडी राखली. अखेरच्या काही क्षणांमध्ये यांगपाबून हिने राहीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला खरा, पण अखेरच्या क्षणी राहीने दमदार पुनरागमन केले आणि सुवर्णपदक पटकावले.