जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत गोमंतकीय खेळाडू म्हणून एकमेव जोडी या स्पर्धेत उतरली आहे. सेलिंग या क्रीडा प्रकारात भारताने प्रथमच भाग घेतला असल्याने कात्या कुएलो आणि ड्वेन कुएलो या जोडीवर भारताची मदार आहे. सेलिंगमधील ‘मिक्स आर- वन’ या शर्यतीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन शर्यती झाल्या त्यात भारतीय जोडी सातव्या स्थानी राहिली. चीनने पाच गुणांसह अव्वल तर हॉँगकॉँगने १० गुणांसह दुसरे स्थान पटकावले. मलेशिया १३ गुणांसह तिसºया क्रमांकावर आहे.
ड्वेन-कात्या ही जोडी या स्पर्धेत प्रथमच उतरली आहे. इंडोनेशियात झालेल्या आशियाई सेलिंग स्पर्धेत शानदार प्रदर्शन केल्यानंतर ड्वेन-कात्या या जोडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. २० वर्षीय ड्वेन आणि १९ वर्षीय कात्या या जोडीने पहिल्या दोन्ही शर्यतीत प्रत्येकी १४ गुण मिळविले. एकूण २८ गुणांसह त्यांनी सातवे स्थान मिळविले आहे. स्पर्धेत एकूण १२ शर्यती होतात. त्यामुळे पुढील शर्यती भारतीय जोडीसाठी अत्यंत्य महत्वाच्या असतील.