जकार्ता - आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नेमबाजाने भारताचे पदक खाते उघडले. 10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपक कुमारने पात्रता फेरीतील सुमार कामगिरीनंतर अंतिम फेरीत जोरदार कमबॅक केले. त्याने 247.7 गुणांसह रौप्यपदकावर कब्जा केला.
सुवर्णपदकाच्या शर्यतीत त्याने चीनच्या यांग हाओरानला कडवी झुंज दिली. चीनी खेळाडूने 249.1 गुणांच्या आशियाई स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. चायनीज तैपेईच्या लू शाओचूनने ( 226.8) कांस्यपदक जिंकले. भारताच्या रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अपूर्वी चंडेलासह मिश्र गटात कांस्यपदक जिंकणाऱ्या रवी कुमारकडून 10 मीटर एअर रायफल पुरूष एकेरी गटात पदकाच्या अपेक्षा होत्या. पात्रता फेरीत त्याने 626.7 गुणांसह चौथे स्थान पटकावले. तर दीपकला 626.3 गुणांसह पाचवे स्थान मिळाले. पात्रता फेरीतील लढतीतील अपयश मागे टाकून दीपकने अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली. त्याने चीन व तैपेईच्या खेळाडूंसमोर कडवे आव्हान उभे करताना सुवर्णपदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.तैपेईच्या शाओचून अव्वल दोन स्थानाच्या शर्यतीतून बाद झाल्यानंतर हाओराना आणि दीपक यांच्यात खरी चुरस रंगली. मात्र, काही शॉट्स मारताना दीपककडून चूक झाली आणि चीनी खेळाडूने सुवर्णपदकावर कब्जा केला. उत्कंठा वाढवणाऱ्या या लढतीनंतर दीपकवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.