जकार्ता - फौआद मिर्झाने वैयक्तिक गटात, तर राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंदर सिंग व मिर्झा यांनी सांघिक गटात भारताला अश्वशर्यतीत रौप्यपदकं जिंकून दिली. आशियाई स्पर्धेत तब्बल 36 वर्षांनंतर भारतीय घोडेस्वाराने वैयक्तिक गटात पदक जिंकण्याचा पराक्रम केला. घोडेस्वार फौआद मिर्झाने रौप्यपदक जिंकून दिले. त्याने 26.40 गुणांची कमाई करताना ही विक्रमी कामगिरी केली. 1982नंतर घोडेस्वाराने पटकावलेले हे पहिलेच पदक ठरले.
भारताच्या रघुवीर सिंग यांनी 1982च्या नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत वैयक्तिक गटातील दोन सुवर्णपदकं जिंकली होती. त्यानंतर वैयक्तिक गटात पदक जिंकणारा मिर्झा हा पहिलाच भारतीय ठरला. भारताने अश्वशर्यतीत एकूण तीन सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्य अशी 12 पदकं जिंकली आहेत. यातील सर्वाधिक दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकं ही 1982च्या आशियाई स्पर्धेत जिंकली आहेत.