मुंबई - भारताच्या सौरभ चौधरीने मंगळवारी आशियाई स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. अवघ्या 16व्या वर्षी सौरभने भारताला सुवर्ण जिंकून दिले. प्रथमच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सौरभने 240.7 या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताच्याच 29 वर्षीय अभिषेक वर्माने 219.3 गुणांसह कांस्यपदक नावावर केले. जपानच्या मात्सूदा टोमोयुकीने ( 239.7) रौप्यपदक जिंकले.जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सौरभने विश्व विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदक नावावर केले होते. त्याने 243.7 गुणांची कमाई करताना हे पदक जिंकले होते. चायनीज तैपेईच्या वँग झेहाओ ( 242.5) याच्या नावावर कनिष्ठ गटाचा विश्वविक्रम होता. सौरभच्या या कामगिरीनंतर आशियाई स्पर्धेतही त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या आणि त्यावर तो खरा उतरला. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच त्याने नेमबाजीला सुरूवात केली होती.