Asian Games 2023 : स्वप्ना बर्मनचे भारतीय नंदिनीवर आरोप, 'ती ट्रान्सजेंडर आहे, मला पदक परत द्या नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 2:01 PM
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय खेळाडूंनी मैदान गाजवले आहे. मात्र, भारताच्या खेळाडूविरोधात भारतीय खेळाडूच उभा राहिल्याचे चित्र दिसतेय.
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय खेळाडूंनी मैदान गाजवले आहे. मात्र, भारताच्या खेळाडूविरोधात भारतीय खेळाडूच उभा राहिल्याचे चित्र दिसतेय. हेप्टॅथलॉनमध्ये कांस्यपदक जिंकणारी नंदिनी आगासरा ( Nandini Agasara) हि ट्रान्सजेंडर असून ती या खेळासाठी अपात्र असल्याचा आरोप २०१८च्या आशियाई स्पर्धेत हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्याच स्वप्ना बर्मन ( Swapna Barman ) हिने सोमवारी सकाळी केला. ''जे पदक मला मिळायला हवे होते ते नंदिनीला मिळाले आहे.हे पदक परत न मिळाल्यास सर्वांचा पर्दाफाश करेन,'' अशी धमकी स्वप्नाने दिली.
स्वप्ना पुढे म्हणाली, "ज्या ट्रान्सजेंडर अॅथलीट्सचे टेस्टोस्टेरॉन लेव्हल २.५ पेक्षा जास्त आहे ते २०० मीटरपेक्षा जास्त लांबच्या इव्हेंटमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. हेप्टाथलॉनमध्ये एवढ्या वेगाने कोणतीही मुलगी धावू शकत नाही. मी १३ वर्षे यात प्रशिक्षण घेतले. अवघ्या ४ महिन्यांच्या प्रशिक्षणाने ही पातळी गाठणे अशक्य आहे.'' यावर्षी ३१ मार्चपासून लागू झालेल्या जागतिक अॅथलेटिक्सच्या ताज्या नियमांनुसार, जे खेळाडू पुरुष यौवनावस्थेतून जात आहेत, त्यांना महिलांच्या स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. बर्मन पुढे म्हणाली की, आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आंतरराज्य स्पर्धेत तेलंगणाच्या खेळाडूने ५७०० गुण मिळवले होते तेव्हाही मी नंदिनीबद्दल तक्रार केली होती. मी यापूर्वी देखील त्याच्या विरोधात निषेध केला होता, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या यादीत तिचे नाव पाहून मला आश्चर्य वाटले. फेडरेशनचे अधिकारी मला पुन्हा विरोध करण्यास सांगत आहेत, ते म्हणतात की ते डॉक्टर नाहीत, फक्त तेच पडताळणी करू शकतात. मला NADA-WADA मध्ये जाण्यास सांगत आहे.अशा परिस्थितीत मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की या विरोधात आवाज उठवा आणि मला मदत करा.
''मी नंदिनीबद्दल तक्रार करताच ती आशियाई क्रीडा स्पर्धेच्या गावातून पळून गेली. ६ ऑक्टोबरला आम्ही हँगझोहून निघणार होतो. माझी आई आजारी असल्याचे सांगून माझ्या तक्रारीनंतर ती पळून गेली, कारण तिची चाचणी होणार होती. तिला इथे आणण्यात कोणाचा हात आहे, हा माझा प्रश्न आहे,''असेही स्वप्ना म्हणाली.