Asian Games 2023: भारताच्या सुतिर्था व अहिका मुखर्जी या बहिणींनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताला ऐतिहासिक पदज जिंकून दिले. मुखर्जी बहिणींनी महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेतील दुहेरी विभागाचे कांस्यपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत प्रथमच टेबल टेनिसमध्ये दुहेरीत भारताला पदक पटकावता आले आहे. उपांत्य फेरीचा सामना अटीतटीचा झाला आणि ७व्या गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत उत्तर कोरियाने ४-३ अशी बाजी मारली.
शनिवारीच दोन्ही खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला जोडी बनून नवा इतिहास रचला होता. या दोघांनी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेंग मेंग आणि वांग यिदी यांचा पराभव करून हे पदक निश्चित केले होते. उपांत्य फेरीच्या लढतीत मुखर्जी जोडीचा सामना उत्तर कोरियाच्या सुयोंग चा आणि सुयोंग पा या जोडीशी झाला. भारतीय जोडीने दमदार सुरुवात करत चार गुणांच्या आघाडीसह पहिला गेम जिंकला. त्यांनी दुसरा गेम कमी फरकाने गमावला असला तरी, त्यांनी लवकरच नियंत्रण मिळवले आणि तिसरा गेम जिंकला, कोरियन खेळाडूंना संधी दिली नाही.
चौथ्या गेममध्ये दोन्हीकडून चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली, कोरियन जोडीने सुरुवातीला तीन गुणांची आघाडी घेतली. मात्र, अहिका आणि सुतिर्था यांनी १०-५ वरून १०-८ असे अंतर कमी करण्यासाठी झुंज दिली. त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता त्यांनी चौथा गेम गमावला. भारत आणि उत्तर कोरिया यांच्यातील रोमहर्षक सामना २-२ असा बरोबरीत आला. कोरियन जोडीने पाचव्या गेममध्ये पुनरागमन केले असले तरी अहिका आणि सुतीर्था यांनी आपली पकड कायम राखली आणि सहाव्या गेममध्ये ११-५ असा विजय मिळवला. या विजयासह त्याने सामना निर्णायक सातव्या गेममध्ये नेला. मात्र, निर्णायक गेममध्ये कोरियन खेळाडूंनी ११-२ अशी बाजी मारली.