Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी केली. महिलांच्या लांब उडीत सर्वांना शैली सिंगकडून पदकाची अपेक्षा होती, परंतु केरळच्या ॲन्सीने कमाल करून दाखवली. तिने तिसऱ्या प्रयत्नात ६.५६ मीटर लांब उडी मारून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. शैली एकीकडे संघर्ष करताना दिसली. गतविजेत्या चीनी खेळाडू शीकी झिआँगला भारताच्या युवा खेळाडू ॲन्सीने कडवी टक्कर दिली. ॲन्सीने पाचव्या प्रयत्नात ६.६३ मीटर लांब उडी मारून रौप्यपदक निश्चित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. झिआँग ६.७३ मीटरसह अव्वल स्थानावर राहिली.
अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आज नोंदवली, तर प्रिती ९ मिनिटे ४३.३२ सेकंदासह तिसरी आली. प्रितीनेही सर्वोत्तम वेळेची नोंद आज केली.
कबड्डी - २०१० व २०१४च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला अ गटातील पहिल्याच लढतीत चायनीस तैपेईकडून बरोबरीवर समाधानी राहावे लागले. शेवटच्या ७ सेकंदात तैपेईने अखेरच्या चढाईत गुण घेत हा सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवला.
हॉकी - भारताच्या पुरुष संघाने अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशला १२-० असे नमवले. हरमनप्रीत सिंग ( ३), मनदीप सिंग ( ३), अभिषेक ( २), रोहिदास, उपाध्याय, गुरजंत सिंग आणि एन शर्मा यांनी प्रत्येकी १ गोल केला.
टेबल टेनिस - भारताच्या सुतिर्था व अहिका मुखर्जी या बहिणींनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताला ऐतिहासिक पदक जिंकून दिले. मुखर्जी बहिणींनी महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेतील दुहेरी विभागाचे कांस्यपदक पटकावले.