Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली. भारताच्या एकूण पदकांची संख्या ही २२ झाली असून त्यात ५ सुवर्ण, ७ रौप्य व १० कांस्यपदकं होती. गुरुवारी वुशू मध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ १० मीटर एअर पिस्तुल सांघिक गटात भारताने सुवर्ण वेध घेतला... अर्जुन सिंग चिमा, सरबज्योत सिंग आणि शिवा नरवाल यांच्या टीमने सर्वाधिक १७३४-५०x गुणांसह गोल्डन कामगिरी केली. चीनला त्यांनी मागे टाकले.
अर्जुन सिंग चिमा आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारच्या वैयक्तिक गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आशियाई स्पर्धेत शिवा नरवालने गोल्ड जिंकले असताना दुसरीकडे त्याचा भाऊ मनिष नरवाल याने पॅरा नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल SH1 प्रकारात २३९.७ गुणांसह वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही पटकावले.