Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ गाजवलेली पाहायला मिळतेय... भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य व ३६ कांस्य अशा एकूण ९० पदकांसह तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय. भारताची ही आशियाई स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे आणि यंदा भारतीय खेळाडूंनी शंभरी पार असे लक्ष्य ठेवले आहे. त्यात सेपाकतक्राव या खेळात भारतीय महिला संघाने भारताला ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून दिले. तिरंदाजीत आज अतून दास, तुषार शेळके आणि धिरज बोम्मादेवारा यांनी इतिहास घडवला. पुरुषांच्या रिकर्व्ह गटाच्या फायनलमध्ये प्रवेश करणारा हा पहिला संघ ठरला.
महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात जन्मलेला आणि लहानाचा मोठा झालेला तुषार एका उद्योगपती कुटुंबातून आला आहे. त्याचे आजोबा स्वर्गीय महादेव राव शेळके (महादबा मेस्त्री) यांच्यापासून ते उद्योगात अग्रेसर आहेत, जे स्वदेशी कोळसा वायू प्रकल्प विकसित करणारे पहिले भारतीय होते. दक्षिण कोरियाविरुद्धच्या फायलनमध्ये भारताने कडवी टक्कर दिली. दक्षिण कोरियाने पहिल्या सेटमध्ये परफेक्ट १० शॉट्समारून २-० अशी आघाडी घेतली. पण, दुसऱ्या सेटमध्ये भारताने १ गुण घेतला, परंतु दोन्ही संघांमध्ये ५७-५७ अशी बरोबरी झाल्याने सेटचा निकाल ३-१ असा कोरियाच्या बाजूनेच होता. तिसऱ्या सेटमध्ये कोरियाने २ गुण घेतले आणि सुवर्णपदक नावावर केले. दक्षिण कोरियाने ५-१ अशी बाजी मारली. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीत भारताने ५-३ अशा फरकाने बांगलादेशला पराभूत केले.