Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ त गुरुवारी वुशू मध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ १० मीटर एअर पिस्तुल सांघिक गटात भारताने सुवर्ण वेध घेतला... अर्जुन सिंग चिमा, सरबज्योत सिंग आणि शिवा नरवाल यांच्या टीमने सर्वाधिक १७३४-५०x गुणांसह गोल्डन कामगिरी केली. त्यानंतर भारताने घोडेस्वारीत ऐतिहासिक पदकाला गवसणी घातली. २३ वर्षीय अनुष अगरवालाने ( ANUSH AGARWALLA) त्याचा घोडा एट्रो ( Etro) याच्यासह कांस्यपदक जिंकले. त्याने ७३.०३० गुणांसह ही विक्रमी कामगिरी केली. आशियाई स्पर्धेत ड्रेसेज ( वैयक्तिक) प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.
हृदयही पदकाच्या शर्यतीत होता, परंतु त्याच्या घोड्याच्या पायातून रक्त आल्याने त्याला माघार घ्यावी लागली. अनुष हा कोलकाताचा आहे आणि त्याने २०२२च्या जागतिक घोडेस्वारी स्पर्धेत सहभाग घेतला होता. ३ वर्षांचा असताना त्याने घोडेस्वारीला सुरुवात केली आणि वयाच्या १७व्या वर्षी तो आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर्मनीत गेला. त्याने जर्मन ऑलिम्पियनपटू ह्युबर्टस श्चिमिच यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेय.
जलतरण - भारताच्या पुरुष ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीहरी नटराज, तनिष मॅथ्यू, विशाल ग्रेवाल आणि आनंद एएस यांनी ३ मिनिटे २१.२२ सेकंदाच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह ही कामगिरी केली.
महिलांनीही ४ बाय २०० मीटर फ्री स्टाईल रिलेत फायनल गाठली. धिनिधी देसिंघू, शिवांगी शर्मा, वृत्ती अगरवाल आणि हशिका रामचंद्रा यांनी ८ मिनिटे ३९.६४ सेकंदाचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला