Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तिसऱ्या दिवशी अखेर भारताने पदकाचे खाते उघडले. नेमबाजी अन् तलवारबाजीत पदकाने हुककावणी दिल्यानंतर सेलिंग या क्रीडा प्रकारात भारताने प्रथमच पदकाची कमाई केली. १७ वर्षीय नेहा ठाकूरने मुलींच्या Dinghy - ILCA4 प्रकारात रौप्यपदक जिंकले. मध्यप्रदेशमधील अमलताज गावातली नेहा ही शेतकऱ्याची पोर आहे. तिने याचवर्षी आशियाई सेलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
- जलतरण - भारतीय पुरूष मेडली रिले संघाने ४ बाय १०० मीटर स्पर्धेत ३:४०.८४ सेकंदाची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम केला. यापूर्वी २०१८मध्ये ३:४४.९४ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम होता.
- तलवारबाजी - भारताच्या भवानी देवीला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या शाओ याकीकडून १५-७ अशी हार मानावी लागली. भारताचे एक पदक गेले.
- नेमबाजी- दिव्यांक्ष सिंग आणि रमिता यांना मिश्र सांघिक गटाच्या कांस्यपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. भारतीय जोडी ८-० अशी आघाडीवर होती, परंतु दक्षिण कोरियाच्या हाजून पार्क व इयून्सेओ ली यांनी सामना १८-१८ असा बरोबरीत आणला अन् शूटआऊटमध्ये २०-१८ असा विजय मिळवला.
- स्क्वॉश - भारतीय महिला संघाने ३-० अशा फरकाने पाकिस्तानला नमवले. १७ वर्षीय अनाहत सिंगने पाकिस्तानच्या सादीया गुलवर ३-० असा विजय मिळवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जोश्ना चिनप्पा व तन्वी खन्ना यांनी पाकिस्तानी प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवला.
- हॉकी - भारतीय पुरुष संघाने आज अ गटातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरवर १६-१ असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या सामन्यात त्यांनी उझबेकिस्तानवर १६-० असा दणदणीत विजय मिळवता होता. आज मनदीप सिंग ( १२ मि., ३० मि. व ५१ मि.) याची हॅटट्रीक अन् कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या ( २४मि. ३९ मि., ४०मि. व ४२ मि.) चार गोल्सच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. व्हीएस प्रसाद ( २३ मि.), गुरजंत सिंग ( २२ मि.), उपाध्याय ( १६ मि.), शमशेर सिंग ( ३८ मि.), मनप्रीत सिंग ( ३७ मि.) आणि अभिषेक ( ५१ मि. ५२ मि.) यांनी दमदार खेळ केला.