Asian Games 2023 IND vs PAK : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताच्या नेमबाजांनी आणखी एक पदकाची कमाई करून दिली. सरबज्योत सिंग आणि दिव्या सुब्बाराजू यांनी शनिवारी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक गटात रौप्यपदक जिंकले. त्यापाठोपाठ टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत ऋतुजा भोसले आणि रोहन बोपन्ना या जोडीने सुवर्णपदक जिंकले. पण, खरी चुरस स्क्वॉशच्या पुरुष सांघिक गटाच्या गोल्ड मॅचमध्ये पाहायला मिळाली. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोर होते आणि भारतीय खेळाडूंनी ०-१ अशा पिछाडीवरुन मुसंडी मारली अन् २-१ असा विजय मिळवला.पाकिस्तानच्या इक्बाल नासीरने पहिल्या सामन्यात भारताच्या महेश माणगावकरचा ११-८,११-३,११-२ असा पराभव करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर माजी आशियाई पदक विजेता अन् संघातील अनुभवी खेळाडू सौरव घोषाल आला अन् त्याने पाकिस्तानच्या आसीम खानला ११-५,११-१, ११-३ असे पराभूत करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानचा नूर झमान आणि भारताचा अभय सिंग हे समोरासमोर होते. दोन्ही खेळाडूंमध्ये कोर्टवर ठसन पाहायला मिळाली... दोघंही एकमेकांना ब्लॉक करताना दिसले..पाकिस्तानच्या खेळाडूकडून रडीचा डाव सुरू होता. त्याच्याकडे २-१ अशी आघाडी होती. पण, अभय सिंगने चौथा गेम ११-९ असा जिंकून सामना २-२ असा बरोबरीत आणला.
भारतीय खेळाडूने निर्णायक गेममध्ये ०-२ अशा पिछाडीवरून ६-६ अशी बरोबरी मिळवली, परंतु पाकिस्तानी खेळाडू जाणीवपूर्वक अभयचा मार्ग अडवत होता हे स्पष्ट दिसत होते. अभयने तरीही त्याला तोडीसतोड उत्तर दिले. पण, पाकिस्तानी खेळाडूने रडीचा डाव खेळून ९-७ अशी आघाडी घेतली. पण, अभयने ११-१० अशी आघाडी घेतली आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. अभयने ११-७, ९-११,८-११, ११-९, १२-१० असा विजय मिळवला.