चीनच्या हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताने आजच्या दिवसाची सुरुवात पदक जिंकून केली. पुन्हा एकदा अचूक निशाणा साधत, भारताच्या नेमबाजांनी रौप्य पदकावर नाव कोरलंय. भारताने पहिल्या तीन दिवसांत गोल्ड मेडलसह १४ पदकं जिंकले आहेत. त्यात, आणखी एका पदकाची भर पडली असून भारताने आत्तापर्यंत १५ पदकांची कमाई केलीय. यावेळी, भारतीय महिला शुटर्सने चीनला टक्कर देत, कोरियावर मात करुन आशियाई स्पर्धेत सिल्व्हर क्रांती घडवलीय.
रायफल शुटींगच्या सांघिक क्रीडा प्रकारात गोल्ड जिंकत भारताने सुवर्णकमाई केली होती. त्यानंतर, नेमबाजीत हे सहावे पदक पटकावले आहे. आशी चौकसे, मनिनी कौशिक आणि सिफत कौर सामरा यांनी महिलांच्या ५० मीटर राइफल ३ च्या सांघिक क्रीडा प्रकारात हे रौप्य पदक जिंकलं आहे.