Asian Games 2023, Hockey : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मंगळवारी भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या सांघिक गटात भारतीय नेमबाजांनी वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्ण जिंकले, त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला हरवून पहिले गोल्ड मेडल नावावर केले. भारताने दोन दिवसांत २ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्य अशा एकूण ११ पदकांची कमाई करून तालिकेत सहावे स्थान पटकावले आहे. आज भारतीय पुरुष हॉकी संघाने आज अ गटातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरवर दणदणीत विजय मिळवला.
- नेमबाजी - दिव्यांक्ष सिंग आणि रमिता यांना १० मीटर एअर रायफल मिश्र गटात कांस्यपदकाच्या सामन्यात खेळावे लागणार आहे. भारतीय जोडीने जबरदस्त पुनरागमन करत ही मजल मारली.
- तलवारबाजी - भारताच्या भवानी देवीने ५ पैकी ५ सामने जिंकून उप उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केले आहे.
- स्क्वॉश - १५ वर्षीय अनाहत सिंगने महिला सांघिक गटात पाकिस्तानच्या सादीया गुलवर ३-० असा विजय मिळवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
भारताने आशियाई स्पर्धा २०२३ची सुरुवातच दणक्यात केली होती, जेव्हा त्यांनी उझबेकिस्तानवर १६-० असा दणदणीत विजय मिळवता होता. आजही त्यांच्याकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. मनदीप सिंग ( १२ मि., ३० मि. व ५१ मि.) याची हॅटट्रीक अन् कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या ( २४मि. ३९ मि., ४०मि. व ४२ मि.) चार गोल्सच्या जोरावर भारताने १६-१ अशा फरकाने सिंगापूरवर दणदणीत विजय मिळवला. व्हीएस प्रसाद ( २३ मि.), गुरजंत सिंग ( २२ मि.), उपाध्याय ( १६ मि.), शमशेर सिंग ( ३८ मि.), मनप्रीत सिंग ( ३७ मि.) आणि अभिषेक ( ५१ मि. ५२ मि.) यांनी दमदार खेळ केला. आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये पाकिस्तानने सर्वात मोठा विजय मिळवलेला आहे. त्यांनी १९७८मध्ये बांगलादेशल १७-० असे नमवले होते.