Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक निश्चित केलं. नेमबाजांनी मंगळवारी 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात आणि महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आज घोडेस्वारांनी सांघिक गटाचे सुवर्ण नावावर केले. मागील 40 वर्षांत भारताने प्रथमच या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या संघात अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, हृदय विपूल छेडा आणि दिव्याकृती सिंग यांचा समावेश होता. या चौघांनी मिळून सर्वाधिक 209.205 गुणांची कमाई केली. अनुष आणि हृदय यांनी अनुक्रमे 71.088 आणि 69.941 गुणांसह वैयक्तिक गटात अनुक्रमे रौप्यपदक व कांस्यपदकही जिंकले. 1982 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते.
भारताने सेलिंगमध्ये दोन पदकांची कमाई केली. १७ वर्षीय नेहा ठाकूरने मुलींच्या Dinghy - ILCA4 प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्यानंतर इबाद अलीने ( Eabad Ali) पुरुषांच्या Windsurfer RS:X गटात कांस्यपदक जिंकले. त्याला तीन फेरींमध्ये अपयश आले होते, परंतु त्याने पुनरागमन केले अन् ५७ गुणांसह तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक निश्चित केले.