Asian Games 2023, Day 12 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी यंदाच्या पर्वात विक्रमी पदकांची कमाई केली. यंदाच्या पर्वात भारताने विक्रमी कामगिरी करताना आपली सार्वकालिक सर्वोत्तम कामगिरी मोडीत काढली. २०१८ च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि १६ सुवर्ण पदकांसह ७० पदके जिंकली होती. आज भारताला तीन सुवर्ण जिंकण्यात यश आले. पण, भारतीय महिला हॉकी संघाला गुरुवारी उपांत्य फेरीत चीनकडून ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघ आता कांस्य पदकासाठी भिडणार आहे.
दरम्यान, भारताच्या ३७ वर्षीय सौरव घोषालला स्क्वॅशमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या वेन योवकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सौरवला रौप्य पदकावर समाधानी राहावे लागले. सौरव घोषाल योवकडून ११-९, ९-११, ५-११, ७-११ अशा चार गेममध्ये पराभूत झाला. सौरवला सुवर्ण जिंकण्यात अपयश आले असले तरी त्याने रौप्य पदकाच्या रूपात देशासाठी ८५वे पदक जिंकले.
याशिवाय १९ वर्षीय अंतिम पंघालने ऑलिम्पिक आणि जागतिक पदक विजेत्या मंगोलियाच्या बॅट-ओचिर बोलोर्तुयाला ३-१ ने पराभूत केले. या विजयासह अंतिमने कांस्य पदकावर आपले नाव कोरले अन् भारताला ८६ वे पदक मिळवून दिले.