Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये कबड्डीमधील दोन सुवर्णपदक निश्चित, याच भ्रमात असलेल्या भारतीय चाहत्यांना आज धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. २०१० व २०१४च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला अ गटातील पहिल्याच लढतीत चायनीस तैपेईकडून बरोबरीवर समाधानी राहावे लागले. शेवटच्या ७ सेकंदात तैपेईने अखेरच्या चढाईत गुण घेत हा सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवला.
२०१८च्या जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये इराणने २७-२४ अशा फरकाने विजय मिळवून भारतीय संघाच्या सुवर्णपदकाची हॅटट्रिक हुकवली होती. त्यानंतर भारतीय महिला संघाला मागील चार वर्षांत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. यंदाची आशियाई स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दुखापतीमुळे ऐन वेळेस त्यांना संघात बदल करावा लागला. आजच्या सामन्यात भारताकडे मजबूत आघाडी होती, परंतु तैपेईच्या खेळाडूंनी चतुराईने खेळ करताना बोनस गुणांसह झटापटीचे गुणही मिळवले.
शेवटच्या २ मिनिटांत तैपेईने भारताला ऑल आऊट करून लोण चढवला. २०१८च्या स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या तैपेईने १३ बोनस गुण घेतले आणि भारताला एकदा ऑल आऊट केले व १ सुपर टॅकल केली. भारताला १२ बोनस गुण घेता आले आणि १ वेळा त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला ऑल आऊट केले. ७ सेकंद शिल्लक असताना भारताने ३४-३३ अशी आघाडी घेतली होती आणि तैपेईच्या खेळाडूने अखेरच्या चढाईत बोनस गुण मिळवला अन् सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवला. भारतीय महिला संघाला प्रथमच बरोबरीच्या निकालावर समाधान मानावे लागले.