Asian Games 2023, Indian Women Kabaddi Team: दोन वेळच्या चॅम्पियन भारतीयमहिला कबड्डी संघाने शुक्रवारी येथे नेपाळचा 61-17 असा पराभव करत सलग चौथ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गत स्पर्धेतील उपविजेत्या भारतालानेपाळ विरुद्धचा रस्ता सोपा होता. पूजा हातवाला आणि पुष्पा राणा यांनी चढाईचे नेतृत्व करत हाफ टाईमपर्यंत भारताला 29-10 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर या सामन्यात भारताने नेपाळला पाच वेळा ऑलआऊट केले. या कामगिरीनंतर आता भारतीय महिला कबड्डी संघाने देशासाठी पदक निश्चित केले आहे. रितू नेगीच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताने नेपाळचा या विजय मिळवला.
भारतीय महिला संघाने आतापर्यंत चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या झारखंडच्या अक्षिमानेही प्रभावी कामगिरी करत यशस्वी चढाई केली आणि दोन टच पॉइंटही मिळवले. जकार्ता 2018 गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणारा भारतीय पुरुष संघ आज उपांत्य फेरीत पाकिस्तानशी भिडणार आहे.
भारतीय रेडर्सना नऊ बोनस गुण मिळाले आणि बचावपटू पाचच बाद झाले. शनिवारी सुवर्णपदकाच्या लढतीत भारताचा सामना इराण किंवा चायनीज तैपेईशी होईल. या दोन संघांपैकी एका संघाची निवड शुक्रवारीच होणाऱ्या उपांत्य फेरीतून होणार आहे. त्यानंतर, शुक्रवारी पुरुष संघ अंतिम फेरीसाठी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.