Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७४ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. त्यापैकी सर्वाधिक २३ पदकं ही ॲथलेटिक्समध्ये मिळवलेली आहेत आणि आज त्यात आणखी भर पडणार हे पक्कं आहे. नेमबाजीत भारतीयांनी २२ पदकं जिंकली आहेत. नीरज चोप्राच्या ( Neeraj Chopra)च्या कामगिरीकडे आज सर्वांच्या नजरा होत्या आणि त्याने पहिल्याच प्रयत्नात ८५ मीटरच्या पार भाला फेकला. पण, १५-२० मिनिटे झाले तरी त्याने नेमकं किती अंतर पार केले हेच दाखवले नाही. त्यामुळे बराच गोंधळ उडाला.
भालाफेकीत नीरज चोप्रा आणि किशोर कुमार जेना हे दोन भारतीय जेतेपदाच्या शर्यतीत होते. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुखापतीमुळे माघार घेतली, तो मागील आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता होता. २०१८मध्ये नीरजने ८८.०६ मीटर लांब भालाफेक करून आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि जेतेपद कायम राखण्याचे आव्हान स्वीकारून तो मैदानावर उतरला. तैपेईचा चेंग चाओ-त्सून हा ९० मीटरच्या वर भालाफेकणारा पहिला आशियाई खेळाडू आहे आणि त्याचा आज पहिलाच प्रयत्न अपयशी ठरला. तांत्रिक कारणामुळे नीरजचा पहिला प्रयत्नाची नोंद न झाल्याने त्याला पुन्हा भाला फेकावा लागला.