Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत २०२३ भारताने शतकाचा पल्ला पार करून इतिहास रचला आणि पदकांचा पाऊस अजूनही सुरू आहे. भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी यांनी पुरुष दुहेरी गटाचे सुवर्णपदक जिंकले. बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत गोल्ड मेडल जिंकणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली. या दोघांनी कोरियाच्या सोलग्यू चोई व वोन्हो किम या जोडीचा २१-८, २१-१६ असा पराभव केला. विजयानंतर सात्विक-चिरागने मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंदला मिठी मारली. सात्विकनेही त्याच्या पायाला स्पर्श केला. यानंतर दोन्ही भारतीय शटलर्सनी कोर्टवर डान्स करून आनंद साजरा केला. सात्विक आणि चिराग हे दोघेही सध्या दुहेरीत पहिल्या क्रमांकाचे खेळाडू आहेत.
भारताने पहिल्या हाफमध्ये १५-१० अशी आघाडी घेतली होती, परंतु इराणने दुसऱ्या हाफमध्ये चांगला खेळ केला. ११ गुण, दोन बोनस गुण व १ लोणचे गुण घेत त्यांनी सामना २८-२८ असा बरोबरीत आणला होता. कबड्डीच्या फायनलमध्ये ड्रामा पाहायला मिळाला. गतविजेता इराण आणि भारत यांच्यात कबड्डीची अंतिम लढतीत शेवटच्या १.०५ मिनिटाच्या खेळाच्याआधी २८-२८ अशी बरोबरी होती. पवनने चढाई केली आणि त्याला पकडण्यासाठी इराणचे बचावपटू सरसावले. त्यांनी पवना कोर्ट बाहेर फेकले, परंतु त्याचवेळी इराणचे ४ खेळाडूही बाहेर गेले.
नियमानुसार भारताला ४ गुण मिळायला हवे होते, परंतु रेफरीने तसं केले नाही. अनेकदा रिप्ले पाहूनही रेफरींनी १-१ असा गुण दिला. नंतर रेफरींनी पुन्हा निर्णय बदलला आणि भारताच्या बाजूने ४-१ असे गुण दिले गेले. इराणच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा रेफरींनी १-१ असा गुण दिला. त्याचा निशेष म्हणून भारतीय खेळाडू कोर्टवर ठिय्या मांडून बसले.