Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ८१ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. आज नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) भालाफेकीतील त्याचे जेतेपद कायम राखले. त्याने ८८.८८ मीटर लांब ( सर्वोत्तम कामगिरी) भालाफेकून सुवर्णपदक निश्चित केले. भारताच्या किशोर कुमार जेनाने ८७.५४ मीटरसह रौप्यपदकावर नाव कोरले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे २७.८५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले. त्यानंतर पुरुषांनी ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. रिले संघासोबत फोटो काढण्यासाठी नीरज जात असताना प्रेक्षकांमधून त्याच्याकडे कुणीतरी तिरंगा भिरकावला अन् त्याने तो खाली पडू नये यासाठी स्वतःला झोकून टाकले.
नीरज चोप्रासोबत चीनी आयोजकांचा चिटींग करण्याचा प्रयत्न, निराश झालेला भारतीय चॅम्पियन
नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८५ मीटरच्या पार भाला फेकला. पण, आयोजकाच्या तांत्रिक चुकीमुळे त्याला पुन्हा प्रयत्न करावा लागला. त्यामुळे बराच गोंधळ उडाला आणि पुन्हा प्रयत्न करताना त्याने ८२.३८ मीटर लांब भालाफेकला, पंचांच्या गोंधळाचा त्याच्या कामगिरीवर नक्कीच फरक जाणवला. पण, नीरजने त्याच्या चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर लांब भाला फेक करून अव्वल स्थान पटकावले. किशोरने ८७.५४ मीटर लांब भालाफेकून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. भारताच्या दोन्ही भालाफेकपटूंनी सुवर्ण व रौप्यपदक नावावर केले. या सामन्यानंतर भारताच्या पुरुष रिले संघाने ४ बाय ४०० मीटर शर्यतीत ३ मिनिटे ०१.५८ सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक नावावर केले.