भारताची युवा गोल्फपटू अदिती अशोक हिने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये इतिहास रचला आहे. अदिती अशोक हिने आज गोल्फमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याबरोबरच आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये पदक जिंकणारी अदिती अशोक ही पहिली भारतीय गोल्फर ठरली आहे.
२०२१ मध्ये जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीमुळे अदिती अशोक ही चर्चेत आली होती. त्यावेळी तिला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. मात्र कामगिरीत सातत्य ठेवत अदितीने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असतील तरी रौप्य पदक पटकावत अदितीने नव्या इतिहासाला गवसणी घातली आहे.
अदिती अशोकने जिंकलेल्या रौप्यपदकाबरोबरच भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. भारतीय क्रीडापटूंनी या स्पर्धेत आतापर्यंत १० सुवर्ण, १५ रौप्य आणि १४ कांस्यपदके जिंकली आहेत. यात भारताला सर्वाधिक पदके ही नेमबाजीमध्ये मिळाली आहेत. नेमबाजीमध्ये भारताने आतापर्यंत ६ सुवर्ण ८ रौप्य आणि ५ कांस्य अशी मिळून एकूण १९ पदके जिंकली आहेत.