चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट सुरू ठेवली आहे. या स्पर्धेतील नेमबाजीमध्ये भारताने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. सरबजोत सिंग आणि दिव्या टीएस यांनी शनिवारी १० मीटर एअर पिस्तूल मिश्रित सांघिक गटामध्ये देशाला रौप्य पदक मिळवून दिले आहे. नेमबाजीच्या अंतिम फेरीमध्ये अटीतटीच्या लढतीत भारतीय नेमबाजांना चीनकडून १४-१६ असा पराभवाचा सामना करावा लागला.
अॅथलेटिक्समध्ये लांब उडीत मुरली श्रीशंकर आणि जेसविन एल्ड्रिन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. श्रीशंकरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ७.९७ मीटर लांब उडी मारत क्वालिफिकेशन मार्क पार केला. तर ज्योती याराजी नित्या रामराजने महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे. हॉकीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात संध्याकाळई ६.१५ वाजता लढत होणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत ८ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य अशी मिळून एकूण ३४ पदके जिंकली आहेत. यामध्ये नेमबाजीमध्ये मिळालेल्या पदकांची संख्या लक्षणीय आहे.