चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी दमदार कामगिरी केली आहे. मात्र पदकांची अपेक्षा असलेल्या कुस्तीमध्येभारताच्या पदरात निराशा पडताना दिसत आहे. स्पर्धेत सुवर्णपदकाची अपेक्षा असलेला भारताचा आघाडीची कुस्तीपटू बजरंग पुनिया याला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता त्याला कांस्यपदकासाठी लढावे लागेल. मात्र त्याच्या पराभवानंतर सोशल मीडियावरून टीकेची झोड उठत आहे.
फ्री स्टाईल कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटामध्ये माजी विश्वविजेता असलेला इराणचा कुस्तीपटू अहमद खलीली रहमान याने बजरंग पुनियाचा ८-१ असा पराभव केला. संपूर्ण सामन्यादरम्यान बजरंग पुनियाला सूर गवसला नाही. तो एकापाठोपाठ एक पॉईंट्स गमावत होता. त्यामुळे त्याला पराभवाच सामना करावा लागला. आता बजरंग कांस्यपदकासाठी लढणार आहे. तिथे त्याचा मुकाबला जपानच्या काइकी यामागुची याच्यासोबत होणार आहे.
बजरंग पुनिया भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये आघाडीवर होता. मात्र त्याला ट्रायलशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने टीकाही झाली होती.
६५ किलो वजनी गटामध्ये विशाल कालीरमण याने ट्रायल जिंकली होती. तसेच त्याचे कुटुंबीय आणि पंचायतींच्या म्हणण्यानुसार बजरंगला ट्रायलशिवाय या खेळामध्ये संधी देता कामा नये होती. मागच्या आशियाई खेळांमधील चॅम्पियन असलेल्या बजरंगने या स्पर्धेत खेळण्यापूर्वी कुठल्याही स्पर्धात्मक सामन्यातही सहभाग घेतला नव्हता.
लेग डिफेन्समधील आपल्या कमतरतेवर तोडगा काढण्यासाठी तो प्रयत्न करत होता. त्याने किर्गिस्तानमध्ये १८ दिवसांचं प्रशिक्षण आणि सराव केला होता. मात्र त्याचा त्याला काही लाभ झाला नाही.
बजरंग पुनिया उपांत्य फेरीत सहज विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याला पराभूत व्हावे लागले. त्याच्या पराभवानंतर सोशल मीडियावरून काही लोकांनी त्याच्यावर टीका केली. यामुळेच त्याला थेट प्रवेश हवा होता, असेही काही लोकांनी लिहिले. मात्र काही जणांनी त्याला पाठिंबा दिला.