नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेत पदकाविना परतावे लागल्यानंतर युवा आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासह दोन पदक पटकावणारी नेमबाज मनू भाकरने पालेम्बांगमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे म्हटले आहे.मनूने आशियाई स्पर्धेच्या २५ मीटर पात्रता स्पर्धेत ५९३ गुणांची नोंद केली, पण तिला पदकाविना परतावे लागले. भारतातील सर्वांत प्रतिभावान युवा नेमबाज म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मनूने अलीकडेच ब्युनास आयर्स येथे झालेल्या युवा आॅलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत वैयक्तिक व मिश्र दुहेरीत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. या कामगिरीसह मनू आशियाई स्पर्धेतील अपयश मागे सोडण्यात यशस्वी ठरली.आशियाई स्पर्धेनंतर युवा आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणे किती कठीण होते, याबाबत मनू म्हणाली, ‘आशियाई स्पर्धेतील माझी कामगिरी मनोधैर्य उंचावणारी होती. मी ५९३ गुणांची नोंदवले. ही माझी सर्वोत्तम कामगिरी होती. असा स्कोअर नेहमी नोंदवता येत नाही.’
आशियाई स्पर्धा ठरली सर्वोत्तम - मनू भाकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 3:30 AM