भारताचा स्टार खेळाडू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे. मात्र भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी सुरू असताना नीरज चोप्राचा एक थ्रो मापण्यात न आल्याने मोठा वादाला तोंड फुटले आहे. तसेच भारताच्या माजी क्रीडापटू अंजू बॉबी जॉर्ज यांनी या प्रकरणी चीनच्या अधिकाऱ्यांवर चिटिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच भारतीयांना जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. नीरज चोप्राने भालाफेकीदरम्यान ८५ मीटर अंतर कापले, असे दिसत होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्याची नोंदच घेतली नाही. तसेच त्याबाबत कुठले कारणही सांगितले नाही.
आपल्या चौथ्या प्रयत्नात सुवर्णपदक निश्चित करणाऱ्या नीरज चोप्राने पत्रकारांना सांगितले की, माझा पहिला थ्रो का मापण्यात आला नाही हे मला माहिती नाही. माझानंतर भालाफेक करणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतिस्पर्ध्याच्या थ्रोचं अंतर मापण्यात आलं. मी एवढंच विचारतोय की, माझ्या पहिल्या प्रयत्नात काय झालं? मी गोंधळून गेलो होतो. कारण मी आतापर्यंत जेवढ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, त्यामध्ये असं कधीही घडलेलं नव्हतं. मला वाटतं की, माझा भाला जिथे पडला ते ठिकाण ते विसरले असावेत. या स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणारा अन्य खेळाडू किशोर जेना याचा दुसरा थ्रोसुद्धा अमान्य करण्यात आला होता. मात्र नंतर निर्णय बदलण्यात आला.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या सीनियर उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्ज यांनी अधिकाऱ्यांकडून भारतीय क्रीडापटूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केला. अंजू जॉर्ज यांनी सांगितले की, ते आमच्यासोबत चीटिंग करण्याचा प्रयत्न करत होते. आमच्या क्रीडापटूंची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करत होते. नीरज चोप्राचा पहिला थ्रो जबरदस्त होता. तिथेच गडबड करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आम्ही नीरजला त्वरित विरोध नोंदवण्यास सांगितले. जेना याचा थ्रोसुद्धा फाऊल देण्यात आला. मात्र खरंतर त्याने एक फूट मागूनच थ्रो केला होता. खरंतर चीनमध्ये विजय मिळवणं खूप कठीण आहे. तिथे आम्ही आपल्या सर्वश्रेष्ठ क्रीडापटूंना उतरवलं तरी ते त्यांना त्रास देण्याच प्रयत्न करतील.