आशियाई स्पर्धेत आजच्या दिवसाची सुरुवात भारताने जोरदार पदकांची कमाई करत केली. मुलींसह मुलांनीही बाजी मारली. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत पलक आणि ईशा सिंग यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून नेमबाजीत भारताची पदकांची घौडदौड सुरूच ठेवली. पलकने सुवर्णपदक जिंकण्यासाठी २४२.१ गुण मिळवले. तसेच ईशा हिने २३९.७ गुणांसह रौप्यपदक पटकावले. याआधी या प्रकारात दोघांनी सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. आशियाई क्रीडा २०२३ मधील ईशाचे हे आतापर्यंतचे चौथे पदक होते.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवसाची सुरुवात धमाकेदार झाली. आजपासून खेळांमध्ये अॅथलेटिक्स स्पर्धांनाही सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच मुलांनी वर्ल्ड रेकॉर्डसह गोल्ड जिंकलं, तर मुलींनीही जोरदार कामगीरी केली. मुलींनी विक्रम मोडत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. साकेथ आणि राजकुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. साकेथ मायनेनीने त्याचे तिसरे आशियाई खेळ पदक (२०१४ मध्ये २) जिंकले होते, रामकुमार रामनाथनसह त्याच्या जोडीने अंतिम फेरीत हरल्यानंतरही रौप्यपदक मिळवले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजीत आणखी एक सुवर्णपदक पटकावले आहे. ऐश्वर्या, स्वप्नील आणि अखिल या जोडीने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. ऐश्वर्या प्रताप सिंग, स्वप्नील आणि अखिल या तिघांनी शूटिंगमध्ये कमाल केली आहे. तिघांनी मिळून ५० मीटर रायफल ३ पोझिशन पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या तिघांनी १७६९ स्कोर केला. चीनच्या जिया मिंग, लिनशू आणि हाओ यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर या स्पर्धेचे कांस्यपदक कोरियाने मिळवले.