आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय तिरंदाजांची सोनेरी घौडदौड कायम आहे. आज भारताच्या महिला तिरंदाजांनी कंपाऊंड वुमन्स तिरंदाजीच्या अंतिम सामन्यात चायनिज तायपै (तैवान) ला पराभूत करत भारताच्या झोळीत आखणी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. यंदाच्या स्पर्धेतील भारताचं हे १९ वं सुवर्णपदक ठरलं आहे. अदिती, ज्योती आणि परनीत कौर या त्रिकुटाने ही कमाल करत भारताला हे सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्याबरोबरच भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या ही ८२ एवढी झाली आहे.
भारताच्या महिला तिरंदाजांनी कंपाउंड वुमन्स तिरंदाजीच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियावर २३३-२१९ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. त्यानंतर अंतिम फेरीमध्ये तैवानच्या तिरंदाजाचं कडव आव्हान मोडीत काढत सुवर्णपदकावर निशाणा साधला.
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ११ व्या दिवशी भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तिरंदाजीच्या मिश्र गटातही एका सुवर्णपदकावर भारतीय तिरंदाजंनी नाव कोरले होते. चार बाय ४०० मीटर रिलेमध्येही भारताच्या खात्यात एक सुवर्णपदक जमा झाले होते. कालच्या स्पर्धेच्या ११ व्या दिशवी भारताने ३ सुवर्णपदकांसह एकूण ११ पदके जिंकली होती.