भारताची स्टार कुस्तीपटू बबिता कुमारीनं मागील वर्षात भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर बबिता सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली आहे. सोशल मीडियावर बबिता सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांची स्तुती करतानाही दिसते. नुकतीच तिची हरयाणा सरकारनं क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी नियुक्ती केली. त्यावरून आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मनजीत सिंग चहल यानं प्रश्न उपस्थित केला आहे.
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय; असदुद्दीन ओवेसी भडकले
2018च्या आशिया स्पर्धेत 800 मीटर शर्यतीत मनजीत सिंग चहलनं सुवर्णपदक जिंकले आहे. त्यानं बबिता फोगाटच्या नियुक्तीवरून हरयाणा सरकारवर टीका केली आहे. ही इतरांना डावलून केलेली ही निवड योग्य आहे का,असा सवालही त्यानं केला आहे. तो म्हणाला,''या महत्त्वाच्या पदावर महिला नियुक्त होणे, ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासाठी आम्हाला का वगळण्यात आले? आम्ही बेरोजगार आहोत. आशिया स्पर्धेपूर्वी माझ्याकडे नोकरी नव्हती आणि आताही मी हरयाणा सरकारकडे नोकरीसाठी झगडत आहे. मी ऑलिम्पिकची तयारी करू की हरयाणा सरकारकडे नोकरीसाठी संघर्ष करू? माझी फाईल दोन वर्ष झाले, तिथेच पडून आहे.''
देशात हरयाणा राज्याच्या क्रीडा धोरणाचं कौतुक केलं जातं, परंतु मनजीतनं याही मुद्द्यावर स्पष्ट मत मांडलं. तो म्हणाला,''क्रीडा धोरण चांगले आहे, परंतु किता अॅथलिट्सना नोकरी दिली गेली? कबड्डीपटू कविता आणि कुस्तीपटू बबिता वगळता कोणाला नोकरी दिली, हे हरयाणा सरकारनं सांगावं. नोकरीसाठी 40-50 खेळाडू सरकार दरबारी रोज फेऱ्या मारत आहेत, पण त्यांना कुणीच दाद देत नाही.''
बबिता आणि कबड्डीपटू कविता देवी यांची हरयाणा सरकारनं क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी नियुक्ती केली आहे. 2018मध्ये बबितानं या पदासाठी अर्ज केला होता. बबिता हरयाणा पोलिसात सब इन्स्पेक्टर होती, परंतु राजकारणात प्रवेश करण्यासाठी तिनं नोकरी सोडली. हरयाणा सरकारनं जाहीर केलेलं 3 कोटींची बक्षीस मनजीतला मिळालं, परंतु अजुनही तो पोलीस दलात नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. दोन वर्ष झाली, तरी त्याची फाईल पुढे सरकली नाही.