चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने आपली सोनेरी कामगिरी सुरू ठेवली आहे. आज तिरंदाजीमध्ये मराठमोळा ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी मिश्र गटात सुवर्णवेध घेत भारताच्या खात्यात १६ वे सुवर्णपदक जमा केले. याबरोबरच भारताच्या यंदाच्या स्पर्धेत जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या ७१ झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी २०१८ साली इंडोनेशियामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७० पदके जिंकली होती. मात्र यावेळी भारताने गेल्या स्पर्धेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली असून, अजून काही स्पर्धांमध्ये भारताचं आव्हान कायम असल्याने पदकांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, आज झालेल्या तिरंदाजीतील मिश्र गटातील अंतिम फेरी भारताच्या ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी अटीतटीच्या मुकाबल्यात दक्षिण कोरियाई तिरंदाजांचं आव्हान परतवून लावलं. १५९-१५८ अशा अवघ्या एका गुणाच्या आघाडीसह भारतीय तिरंदाजांनी सुवर्णपदकावर नाव कोरले.
दरम्यान, तिरंदाजीमधील पुरुषांच्या वैयक्तिक गटामध्येही ओजस देवतळे आणि अभिषेक वर्मा यांनी अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या गटातील सुवर्ण आणि रौप्यपदकं भारताच्या झोळीत जाणार हे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी आज दिवसातील स्पर्धांना सुरुवात झाल्यावर ३५ किमी चालण्याच्या शर्यतीत मिश्र गटात मंजू राणी आणि राम बाबू यांनी सांघिक प्रकारात देशाला कास्य पदक जिंकून दिले.